मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

प्रेरणावाटच !

 
एक छोटं तळं होतं. तळ्यात बगळ्यांची इटुकली पिटुकली पिल्लं जलविहार करीत. त्यात एक हडकुळलं, सगळ्यांपेक्षा वेगळं दिसणार पिल्लू होतं. कुरूप-कुरूप म्हणून त्याला सगळेच चिडवत असत. ते पिल्लूही हिरमुसून जायचे.पाण्यात एकटक पाहून आपल्या वेगळ्या दिसण्यावर विचार करायचे. दिवसामागून दिवस गेले. पिल्लं मोठी झाली नि ज्या पिल्लाला सगळे करूप म्हणून हिणवत असतं ते पिल्लू सर्वांपेक्षा वेगळ का, याचा उलगडा झाला. ते पिल्लू बगळ्याचं नव्हतचं मुळी. तर तो एक राजहंस होता. ऐटदार, नितांत सुंदर पण पाहणा-यांच्या नजरेतच सौंदर्य नसल्याने त्याला हिणवले जायचे. शेवटी त्याचं सौंदर्य इतर सर्व पिल्लांनीही मान्य केले. असंच काहीस सिद्धार्थ जाधव या गुणी कलाकरासोबत झालं.
मराठीतील सुपरस्टार अशी सिद्धार्थची आज सबंध महाराष्ट्रात ओळख आहे. हिंदी चित्रपटांतही त्याने आपला ठसा उमटविला आहे; परंतु त्याच्या या यशामागं कठोर परिश्रम आहेत. हेटळणी करणा-या नजरा आहेत. तो कुरूप दिसतोय म्हणून खिल्ली उठविणा-यांचे बोचरे शब्द आहेत तशी पोटाला चिमटा घेऊन आपल्या पोरांनी शिकावं, मोठं व्हावं यासाठी दिवसरात्र काटकसर करणा-या मध्यवर्गीय बापाची मेहनतही आहे. शाळेत असताना सिद्धार्थ नाटकात भाग घ्यायचा. पण त्याच्या सोबत जे असायचे ते त्याच्या दिसण्याहून त्याची टिंगल उडवायचे. पुढे कॉलेजला गेल्यावरही काहीसे हेच अनुभव आले. नाटकांत, चित्रपटांत काम करायचे तर देखणा चेहरा लागतो, असे बरेच जण त्याला म्हणत. पण सिद्धार्थ खचला नाही. ध्येयापासून ढळला नाही. कारण तो आहेच या सगळ्यांपेक्षा वेगळा. कलेतला राजहंसच. कलेसाठी जगणारा. त्यामुळेच त्याने कलेच्या क्षेत्रात धुव्र्र ता-याप्रमाणे आपले स्थान पक्के केले.
२३ ऑक्टोबर १९८१ ला रत्नागिरी जिल्ह्यातील केळवली (ता. राजापूर) या खेड्यात सिद्धार्थचा जन्म झाला. त्याला एक मोठा भाऊ तो डॉक्टर आहे तर त्याची बहीण एनजीओत काम करते. तो सर्वांत लहान आहे. त्यामुळे शेंडेफळ म्हणून या दोघांपेक्षाही त्याचे अधिक लाड झाले. वडील मुंबईत बीएमसी लॅबमध्ये टेक्निकल म्हणून काम करीत असतात. ते मुंबईत एकटेच राहात. बाकी सगळं कुटुंब गावाकडे. वडील दर महिन्याला घरी पगार पाठवत. त्यांच्या पगारातच सगळं भागवावं लागे. नियोजन करताना आईची खूप ओढातान होई. कोकणातल्या समुद्राप्रमाणे या कुटुंबाच्या नशिबीही सुखदुःखाची भरती-ओहटी येई. पुढे १९८८ मध्ये वडिलांनी सगळ्यांनाच मुंबईत नेले. खेड्यातला मोकळेपणा चाळीत बंदिस्त झाला. घरभाड, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरखर्च आणि जॉबच्या ठिकाणी जाण्यायेण्याचे प्रवासभाडे या सगळ्यांची जुळवाजुळव करताना वडिलांची फार दमछाक होत होती. पण त्याची झळ त्यांनी आपल्या मुलांना कधी लागू दिली नाही. सिद्धार्थ शाळेतील नाटकात भाग घेऊ लागला. कधी बक्षीसही मिळे. त्याचे खूप कौतुक वाटे. आईवडील आणि त्याच्या भाऊबहिणीने त्याला सतत पाठबळ दिले. आपण नाटकाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावे असे सिद्धार्थला नेहमी वाटायचे त्यासाठी त्याने मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाची प्रवेश परीक्षा दिली. तो पास झाला. प्रवेशही निश्चित झाला. सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करणे सोपे आहे. पण पैशांची जुळवाजुळव करणे खूप अवघड आहे, याचा प्रत्यय त्याला आला. अ‍ॅडमिशन फी साठी त्याच्याकडे पैसे नव्हते. वडिलांकडे मागावे तर त्यांची अडचण तो ओळखून होता. स्वाभाविकच तो या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकला नाही. आज त्याच सिद्धार्थला या नाट्यशास्त्र विभागात गेस्ट लेक्चरर म्हणून आंमत्रित केलं जातं. हे पाहून त्याच्या आईवडिलांची छाती आनंदाने फुगून जाते.
आजवर सिद्धार्थने अनेक नाटकांत, चित्रपटांत काम केले. सध्या तो ‘धमाल मस्ती’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटांतही तो मनापासून अभिनय करीत आहे. आपल्या कामाशी प्रामणिक राहणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे. आयुष्यात कधी आत्मविश्वास गमाविला नाही आणि आईवडिलांवरील श्रद्धा कमी होऊ दिली नाही, यामुळेच इथेपर्यंत पोहोचू शकलो, असे तो अत्यंत नम्रपणे सांगतो. निश्चित त्याचा प्रवास म्हणजे प्रेरणा वाटच आहे.
                                                                                                          - विकास वि. देशमुख

                                                                                                             Vikas Deshmukh
                                                                                                             Karda, Risod, Washim

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा